“गुढी पाडवा,पट वाढवा उपक्रम ” जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांचा पट टिकून राहावा,वाढावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने “गुढी पाडवा,पट वाढवा” हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत पालक सभा आयोजित करण्यात येतात.या सभेत पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश फॉर्म भरून घेण्यात येतात. इयत्ता पहिलीसाठी दाखल करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेमध्ये आयोजित करण्यात येतो. दाखल केलेल्या सर्व मुलांना साखरेचा हार,चॉकलेट, गुलाब पुष्प,शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात येते. नव्याने दाखल होत असणारी ही बालके शाळेत रमण्यासाठी शाळांमध्ये मनोरंजक खेळ,वैयक्तिक परिचय व ओळख,चित्रांची पुस्तके,खेळ, गाणी- गप्पा-गोष्टी यासारखे उपक्रम मार्च/ एप्रिल महिन्यात शाळांमध्ये राबविण्यात येतात. शालेय वातावरणात ही मुले रमण्यासाठी या उपक्रमांची मदत होत आहे.